शैक्षणिक

महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी आणि पालकांचे उत्साहात स्वागत

लातूर : महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय, लातूर येथे बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या आज दि. १८ जून २०२४ पासून नियमित वर्गांना सुरुवात झाली.
महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते पुष्पहार तर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे, बोर्ड समन्वयक डॉ. गुणवंत बिरादार, कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
आज महाविद्यालयातील बारावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा पहिला दिवस असल्याने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय हे महाराष्ट्रातील ०५ शाखांमधून शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाला नॅकने अ दर्जा बहाल केला आहे. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी ग्रामीण व शहरी भागातील असून गरीब आणि गरजू विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. आज पालक आणि विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ बघून मनस्वी आनंद झाला.
यावेळी उपप्राचार्य प्रा. संजय पवार म्हणाले की, लातूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये नियमित वर्गात उपस्थित राहून नियमित अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते. हा लातूर पॅटर्नचा यशस्वी होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांचा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमामुळे वाढ होते असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे यांनी मानले. यावेळी कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांनीही विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाभाऊ बोडके, शुभम बिरादार आणि जगन्नाथ येचेवाड यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button