शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अर्थसहाय्य करावे-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे
जिल्हास्तरीय बँकर्स समितीची आढावा बैठक ‘माझं लातूर, हरित लातूर’साठी बँकांकडून विकसित केले जाणार ‘ग्रीन कॉरिडॉर’
लातूर, : शेतकरी, बेरोजगार युवक, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध योजना राबवून त्यांना अनुदान स्वरुपात मदत केली जाते. अशा योजनांच्या अंमलबजावणीमध्ये बँकांची भूमिका महत्वाची असते. लातूर जिल्ह्यात या शासकीय योजनांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होण्यासाठी बँकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी शुक्रवारी जिल्हास्तरीय बँकर्स समिती बैठकीत दिल्या.
निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रमेश जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर,नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण खडके, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. कुटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मन्सूर पटेल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासात शेती आणि शेतकरी हा महत्वाचा घटक असून त्यांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वित्त पुरवठा करणे बँकांची जबाबदारी आहे. सध्या खरीप हंगामात पीक कर्ज वितरणाला बँकांनी प्राधान्य देणे आवश्यक असून प्रत्येक गरजू, पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतीशी निगडीत उद्योग, व्यवसायासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून बँकांना प्रस्ताव सादर केले जात आहेत. या प्रस्तावावर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घेवून अशा उद्योग, व्यवसायाच्या उभारणीला बँकांनी हातभार लावावा. पीक कर्ज, कृषी उद्योग-व्यवसायाशी निगडीत कर्ज वितरणाचा यापुढे नियमित आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्मार्ट प्रकल्प, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, महिला बचतगटांना अर्थसहाय्य आदी विविध योजनांचा यावेळी बँकनिहाय आढावा घेण्यात आला.
*‘माझं लातूर, हरित लातूर’साठी आता बँकांचाही पुढाकार*
जिल्ह्यातील वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियानाला ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता जिल्ह्यातील बँकांनीही यामध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शविली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्मितीची जबाबदारी या बँकांना दिली जाणार असून त्यांना नेमून दिलेल्या मार्गावर वृक्षारोपण व त्याचे संगोपन बॅंकांमार्फत होणार आहे.