जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून टाकळी येथे साकारणार ‘बांबू म्युझियम’
लातूर : जिल्ह्याला हरित जिल्हा बनविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून ‘माझं लातूर, हरित लातूर’ अभियान राबविले जात आहे. यनिमीत्तने वृक्ष लागवडीसाठी विविध संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाल प्रतिसाद देत लातूर तालुक्यातील टाकळी ब येथे आर्ट ऑफ लव्हिंगच्या माध्यमातून 10 हजार वृक्षांची लागवड होत असून आज जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपणाला प्रारंभ झाला. याठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून ‘बांबू म्युझियम’ साकारले जाणार असून यामध्ये विविध देशातील बांबूच्या प्रजातींची लागवड केली जाणार आहे. तसेच फळझाडे, औषधी वनस्पतींचीही लागवड केली जाणार आहे.
या ठिकाणी 1 हजार बांबू रोपांची लागवड करून वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ झाला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, सरपंच मनीषा उपाडे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संचालक सामाजिक प्रकल्प महादेव गोमारे, नायब तहसीलदार गणेश सरोदे, तलाठी संदेश राठोड, ग्रामसेवक संदीप राठोड, वेंकटेश कोरवड, संजय गायकवाड, भास्कर विश्वकर्मा, रोहित सरवदे कृष्णा नरवडे यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या बांबू मिशन अंतर्गत देशभरात बांबू लागवड व उद्योगासाठी शासन मोठ्या प्रमाणावर योजना राबवत आहे. टाकळी येथे साकारणाऱ्या बांबू म्युझियमच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना देशभरातील विविध प्रकारच्या बांबूच्या प्रजातीची माहिती मिळणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बांबू निवडण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना योग्य प्रजातीचा बांबू व त्याचे फायदे याची माहिती मिळाली तर शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही व शेतकरी विचार करून योग्य त्या प्रगती प्रजातीचा बांबू आपल्या शेतावर लागवड करेल. ज्यामुळे शेतकऱ्यांना आपला बांबू विक्रीसाठी किंवा त्यावर प्रक्रिया करण्यासाठी सोयीचे जाईल, अशी बांबू म्युझियम निर्मितीची संकल्पना आहे. याठिकाणी प्रत्येक बांबूची सविस्तर माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आगामी काळात फर्निचरसाठी बापू हा सर्वात चांगला पर्याय राहणार आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यासाठी बांबू हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या बांधावर बांबूची लागवड केल्यास त्यापासून शेतकऱ्यांना निश्चित आणि शाश्वत उत्पन्न मिळणार आहे. बांबूमुळे जलसंधारण आणि मातीची होणारी धूप थांबवण्यासाठी मदत होणार आहे. वातावरणातील बदलाचे परिणाम रोखण्यासाठी आणि ग्रीन हाऊस गॅसेस कमी करण्यासाठी बांबूची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे श्री. गोमारे म्हणाले.
टाकळी ग्रामस्थांनी बांबू लागवडीसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. याठिकाणी लावण्यात येणाऱ्या झाडांची जोपासना करण्याची खरी जबाबदारी नागरिकांची आहे. पुढील पिढीच्या भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन आवश्यक असून यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनामध्ये पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच वृक्षारोपणासाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी त्यांनी संवाद साधला.
टाकळी ब. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देणारी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनीही त्यांचे कौतुक केले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने घरीही वृक्षारोपणाचा आग्रह धरण्याचे आवाहन केले. टाकळी येथे यापूर्वी एकूण 35 एकर जागेवर वृक्षारोपण करण्यात आले असून या झाडांची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली.