लातूर : मनपाच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे भाडे थकीत असल्यामुळे पालिकेने शनिवारी (दि.२९) ८ गाळ्यांना सील ठोकले.या कारवाईत ९ लाख ५० हजार ९६१ रुपयांची वसुलीही करण्यात आली.
मनपाच्या मालकीचे गाळे व्यावसायिकांना करारावर देण्यात आलेले आहेत.अनेक व्यावसायिकांकडून या गाळ्यांचे भाडे वेळेवर भरणा केले जात नाही. पालिकेकडून वारंवार नोटीसा देऊनही भाडे न दिल्यामुळे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशानुसार विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.त्या अंतर्गत शनिवारी गांधी मैदान साईट क्रमांक १११ व ११२ व्यापारी संकुला मधील ८ गाळ्यांना सील ठोकण्यात आले.यावेळी व्यावसायिकांकडून १ लाख ५० हजार रुपये रोख व ८ लाख ९६१ रुपयांची वसुली धनादेशाद्वारे करण्यात आली.
ज्या गाळेधारकांकडे थकबाकी आहे अशांनी आपल्याकडील बाकीचा तात्काळ भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे.भाडे भरणा न केल्यास गाळेधारकांवर याच पद्धतीची कार्यवाही करण्याचा इशारा उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांनी दिला आहे.
…….तर गाळ्यांचा फेरलिलाव करणार भाडे थकविल्यामुळे मनपाकडून गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे.परंतु गाळे सील करूनही अनेक व्यावसायिकांकडून भाडे भरणा करण्यात येत नाही.ज्या व्यावसायिकांचे गाळे भाड्यापोटी सील करण्यात आले आहेत अशांनी तीन दिवसांच्या आत भाडे मनपाकडे जमा करावे.अन्यथा संबंधित गाळ्यांचा करार रद्द करून त्यांचा फेरलिलाव करण्यात येईल,असा इशारा मनपाकडून देण्यात आला आहे. |